दुकानांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची वर्दळ वाढली!जुनी पुस्तके खरेदीकडे ओढा

शाळा सुरू होण्यास काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिल्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी दुकानात गर्दी होत आहे. शालेय साहित्याचे भरमसाट दर, शाळांचे शुल्क यांचे बजेट सर्वसामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर असते.

त्यामुळे यंदा एक महिना आधीच जुन्या पुस्तकांसाठी विद्यार्थी, पालकांची वर्दळ वाढली आहे. यावर्षी पुस्तकांच्या दरात कोणतीही वाढ झाली नसली तरी विद्यार्थी, पालकांची जुन्या पुस्तकांना पसंती ठाम असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातून मागणीचा ओढा सर्वाधिक असून, प्रत्येकजण जुनीच पुस्तके घेऊन खर्चात बचत करत आहेत.मागील वर्षी तब्बल तीस टक्क्यांनी पुस्तकांच्या किमतीत वाढ झाल्याने पालकांना घाम फुटला.

यातून गतवर्षी शाळा सुरू होण्याच्या एक आठवडा अगोदर पालकांनी जुन्या पुस्तकांचा पर्याय शोधला आणि काहीशी आर्थिक कोंडी दूर झाली. यंदा मात्र शाळा सुरू होण्याच्या महिनाभर आधीच मुलांच्या भविष्यासाठी पालकांची पहिली पसंती जुन्या पुस्तकांना दिली.

त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील जुनी पुस्तके विक्री दुकानात दिवसभर विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसत आहे. मुलांना लागणारी पुस्तके वेळेत मिळावी व कमी दरात मिळावी हा संयुक्त अट्टाहास पालकांचा आहे.तसेच अनेक पालक मागील इयत्तेची जुनी पुस्तके विक्री करून त्याच किमतीत जुनी पुस्तके खरेदी करत आहेत.

यामुळे जुनी पुस्तके पुन्हा वापरात येत आहेत. परिणामी पालक नवीन पुस्तकांच्या भानगडीत पडताना दिसत नाहीत. नव्या पुस्तकांप्रमाणे जुन्या पुस्तकांची चांगली सोय विक्रेत्यांनी केली आहे. इयत्तेनुसार पुस्तकांचे खास सेट विक्रीस आहेत. जुना सेट नवीनच्या तुलनेत ७० ते ८० टक्क्यांनी स्वस्त मिळत असून, सिंगल पुस्तकाचे दरही ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत आहेत.