मताधिक्याइतकी वृक्षलागवड संपूर्ण मतदारसंघासह परिसरात करण्याचा आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा संकल्प

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉ. राहुल आवाडे यांना ५६ हजार ८११ इतके मताधिक्य मिळाले आहे. पण ज्यांच्या बळावर आपण हे यश प्राप्त केले त्या जनतेच्या प्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी व जनहित सार्थकी लावण्यासाठी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भारतीय  जनता पार्टी महायुतीचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ५६ हजार ८११ मताधिक्या इतकी संपूर्ण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ व परिसरात वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. आम, डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या आजोबांच्या पर्यावरणाचे जतन या संकल्पनेला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून केला आहे.

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात केलेली वृक्षलागवड राज्यातच नव्हे तर देशभरात नांवलौकिकास पात्र ठरली आहे. त्याच धर्तीवर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या मताधिक्याइतकी वृक्षलागवड संपूर्ण मतदारसंघासह परिसरात करण्याचा संकल्प आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी केला आहे. पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्याला मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांचा हा संकल्प वस्त्रनगरी, औद्योगिकनगरी असलेल्या इचलकरंजीला वायु प्रदुषणापासून मुक्त होण्यासाठी पर्यावरणदृष्ट्या महत्वाचा व समृध्द करणारा असा आहे.