आष्टा येथील सोमेश्वर मंदिर हे हेमाडपंथी असून, महाशिवरात्रीसह श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी होते. माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे व तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमलिंग तलाव सुशोभीकरणासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, काम रखडल्याने सामाजिक संस्थांनी वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबविले. आष्टा शहरात अष्टलिंगापैकी एक असलेल्या सोमेश्वर मंदिरासमोर सोमलिंग तलाव आहे.
या तलावाच्या ठिकाणी केंद्र शासनाच्या विशेष अनुदान योजनेतून पाच कोटी चाळीस लाख खर्चून अद्ययावत बगीचा व बोटिंग सुविधा विकसित करण्यात येत आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. सोमलिंग सुशोभीकरणाचे काम सुरू असून, तलावातील पाणी या ठिकाणी विविध प्रकारची झाडे, आकर्षक प्रवेशद्वार, चेनलिंग कंपाऊंड, बोटिंग, प्रेक्षक गॅलरी, पाण्यातील गॅलरी नयनरम्य बगीचा, खाऊ गल्ली, अत्याधुनिक लाईटची व्यवस्था, पर्यटकांच्यासाठी विविध सोयी सुविधा करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी दिली.
सोमलिंग तलाव सुशोभीकरणामुळे आष्ट्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. सोमलिंग तलाव सुशोभीकरणासाठी भाजपचे नेते निशिकांत पाटील व पालकमंत्री आ. सुरेश खाडे यांच्या प्रयत्नाने आष्टा नगरपरिषदेला केंद्र सरकारच्या विशेष अनुदान योजनेतून पाच कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले. काम सुरु झाल्याने नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.