आज रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी हातकणंगले तालुक्यातील आळते येथील श्री रेणुका देवीची मुख्य यात्रा संपन्न होत असून याच दिवशी उगवती पौर्णिमा असल्याने नैवेद्य रात्री पालखी व पहाटे बांगड्या फोडण्याचा विधी होणार आहे . रेणुका देवस्थानचे पुजारी व आळते ग्रामपंचातीने यात्रेला येणाऱ्या भाविकांच्यासाठी यात्रेची पुर्ण तयारी केली आहे. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला आहे. आळते येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून ही भाविक येतात.
आज रविवार यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटे अभिषेक काकड आरती पुजा अर्चा केल्या नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. दिवसभर नैवेद्य वाहणे नवस फेडणे, लिंब नेसने असे विधी पार पडतील. रात्री पालखी सोहळा व पहाटे कांकणे फोडणे हे महत्वाचे विधी होतील. यात्रेनिमित्ताने मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून श्रीरेणुका, श्री मातंगी, श्री परशुराम मंदिरांची रंगरंगोटी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .
खेळणी, पाळणे, नारळ कापूर मेवा मिठाई हॉटेल तसेच अन्य खाऊ विक्रेत्यांनी यापुर्वीच दुकाने थाटली आहेत . श्री रेणका देवीची पालखी रात्री बारा वाजता सुती चौंडक्याच्या निनादात व उदग आई उदच्या गजरात मंदिरा पासून गाव भेटीसाठी येईल. यानंतर पालखी परत यात्रा स्थळी आल्यानंतर खाई जवळ येईल या ठिकाणी बांगड्या फोडण्याचा विधी होईल.
पालखी मंदिर प्रदक्षिणा सोहळा पार पडेल. यानंतर यात्रेची सांगता होईल. यात्रा झाल्यावर देवीचे मंदीर तीन दिवस भाविकांच्या दर्शना साठी बंद असते. अशी माहिती पुजारी प्रदिप कदम, अमोल कदम व अमर कदम व संजय कांबळे यांनी दिली.