बदलणाऱ्या भावी समीकरणांची राजकीय वर्तुळात चर्चा

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी महायुतीतील जयंतरावांचा इस्लामपूर मतदारसंघ आपल्याकडे घेत तिथून जयंतरावांना कडवे आव्हान उभे केले नव्हे तर स्वतः प्रचारात उतरत जयंतविरोधी चिडीची चुणूक दाखवली. मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या जयंत पाटील यांना अल्प मताधिक्य मिळाले अन् सरकार स्थापनेचे स्वप्नही भंगले. मंत्रीपद आणि सत्तेशिवाय जयंतराव या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. विधानसभा निवडणुकीत एकमेकांना पाण्यात पाहणारे अन् टीकेची झोड उठवणारे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात आता काहीशी दिलजमाई होतानाचे चित्र पुढे येत आहे.

नुकतेच विधिमंडळातील जयंतरावांचे भाषण… नार्वेकरांची सुधारणा.. अन् अजितदादांची ऑफर महाराष्ट्रामध्ये गुंजली. राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्याला अजित दादांनी चक्क ऑफर दिली. मात्र मुरब्बी जयंतरावांनी योग्य वेळेची भविष्यवाणी केली. आता सत्तेशिवाय पाच वर्षे या तर्कात गर्क जयंतसेनेची योग्य वेळ, योग्य निर्णय याकडे मदार लागली आहे. वेळेच्या घड्याळातील जयंतरावांचे काटे आता घड्याळातच फिरणार की भाजपच्या कमळाला टोचणार हे जयंतरावांचे योग्य वेळी योग्य निर्णय यांनी कळेल. तूर्तास मात्र अजित पवार, जयंत पाटील यांच्यातील संवाद समाज माध्यमाबरोबरच राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.