कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंगचे नुकतेच उदघाटन झाले असून ही बिल्डिंग येत्या गुरुवारपासून प्रवेशांच्या सेवत सुरू करण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने याची पूर्ण तयारी केली असून शुक्रवारी बैठक घेऊन विविध विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे ऐतिहासिक प्रतिबिंब विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये उमटले आहे. या बिल्डिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्चला उदघाटन करण्यात आले.
मात्र, काही किरकोळ कामे राहिली असल्याने ही बिल्डिंग खुली केली नव्हती. या टर्मिनल बिल्डिंगमधील विमान कंपन्यांची कार्यालये व इतर आवश्यक गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी यंत्रणांची धावपळ सुरू आहे. येत्या गुरुवारपर्यंत ही अर्धवट कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दरम्यान, टर्मिनल बिल्डिंग ते धावपट्टीपर्यंत प्रवाशांना ने-आण करण्यास बसची सुविधा केली आहे.
कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा ३१ मार्चपासून पूर्ववत सुरु करण्यात येणार आहे. कोल्हापूर विमानतळावरून रविवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस सकाळी ११ वाजता टेकऑफ होईल. हे विमान तिरुपतीला १२:१० मिनिटांनी पोहोचेल. तिरुपतीहून १२:३५ मिनिटांनी सुटणारे विमान कोल्हापुरात १:४५ वा. पोहोचेल. टर्मिनल बिल्डिंग गुरुवारपासून सुरु करण्यास विमानतळ प्राधिकरणाकडून आवश्यक सर्व ती उपाययोजना केली आहे. सध्या विमान कंपन्यांच्या कार्यालयाची कामे झाली की बिल्डिंग सेवेत सुरु करणार आहोत.