यड्राव (ता. शिरोळ) येथे भाजीपाला तोडणीसाठी शेतात गेल्याची संधी साधून चोरट्याने शेतकऱ्याच्या घरात भरदिवसा चोरी केली. कुलूप तोडून घरातील दोन तिजोऱ्या फोडून सुमारे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख दोन हजार रुपये असा एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला.इक्बाल महेर आलासे (रा. रेणुकानगर, यड्राव) यांच्या फिर्यादीनुसार याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, इक्बाल आलासे शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीनच्या सुमारास कुटुंबियांसह शेतात भाजीपाला तोडणीसाठी गेले होते. त्यानंतर शेजारील नागरिकाने घराला कडी असल्याचे आलासे यांना फोनवरून सांगितले. शेजारील नागरिकाच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला आणि कडी काढून घराची पाहणी केली असता, दोन तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून पडल्याचे दिसले. आलासे कुटुंबीय घरी आले आणि घरात चोरी झाल्याची माहिती शहापूर पोलिसांना दिली.चोरट्याने दोन तिजोऱ्या फोडून त्यातील २२ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, सव्वा तोळ्याची प्रत्येकी सोन्याची पट्टी, सोन्याचे नेकलेस, सोन्याची मिनी गंठण, पाच ग्रॅमचे टॉप्स, तीन ग्रॅमची अंगठी तसेच रोख दोन हजार रुपयांवर डल्ला मारला.
घरफोडीत चोरट्याने एकूण तीन लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तिजोरीतील अन्य साहित्य अस्ताव्यस्त करून चोरट्याने पैशाची बॅग तिथेच टाकली.तसेच पैसे व दागिने शोधून तिजोरीतील सर्व साहित्य बेडवर विस्कटून टाकले. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले होते. दरम्यान, घटनास्थळी बाजूला क्रिकेट खेळणाऱ्यांचा सुरू असणारा गोंधळ आणि भरदुपारी नागरिकांची वर्दळ असतानाही चोरट्याने चोरीचे धाडस केले. प्राथमिक माहितीनुसार, चोरटा माहीतगार असल्याचे तपासात समोर आले आहे.