प्रत्येक भागात काही ना काही प्रसिद्धी असतेच. म्हणजेच ज्याला विशेष महत्व असते. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे चांदी उद्योग खूपच फेमस मानला जातो. जास्तीत जास्त येथे चांदी व्यावसायिक यांची संख्या पहायला मिळते. हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये चांदी व्यवसायांसाठी राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुरवठा बंद केल्याने नवं उद्योजकांची कोंडी झाली होती. यामुळे सबसिडी अथवा विविध योजनांचा लाभ घेता येत नव्हता. मात्र, ही अडचण आता दूर झाली असून चांदी उद्योजक कर्जा वाचून वंचित राहता कामा नये अशा सक्त सूचना शिखर बँकेने सर्वच राष्ट्रीयकृत बँकाना दिल्याने चांदी उद्योजकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हुपरी परिसरातील चांदी उद्योजकांना चांदी उद्योगासाठी काही राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका पी एम विश्वकर्मा, अण्णासाहेब पाटील महामंडळ, पीएमजिपी, सिएमजिपी आदी शासकीय योजनासह मध्यम मुदत यासारखी कर्जे देत नाहीत. त्यामुळे चांदी उद्योगाची वाढ खुंटली आहे. अशा बँका विरोधात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली होती. याची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी शिखर बँकेला हा प्रश्न तात्काळ सोडवण्याबाबत पत्र दिले होते.
याचीं दखल घेत शिखर बँकेचे जिल्हा मुख्य अधिकारी गणेश गोडसे यांनी हुपरी परिसरातील राष्ट्रीयकृत बँकाना पात्र चांदी उद्योजकांना सर्व शासकीय योजनासह, मुदत कर्जे वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, यामध्ये एक ही पात्र उद्योजक कर्जाविना वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याची विशेष सूचनाही केली आहे. तसेच अपात्र उद्योजकांना कर्ज नामंजूर करण्याचे लेखी कारण कळवण्याचा आवर्जून उल्लेख करीत चांदी उद्योग वाढीसाठी कर्ज पुरवठा करून हातभार लावण्याचे आवाहन केले आहे.
निरव मोदी प्रकरणापासून गेली दहा वर्ष चांदी उद्योगाचा कर्ज पुरवठा सर्वच बँकानी थांबवला होता. मोठ्या ठकसेनांचा बँकाना फटका मात्र, चांदी व्यावसायात कष्टाने पुढे जाणाऱ्या नवं उद्योजकाला फार मोठा चटका बसला होता. हुपरी चांदी हस्तकला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे विकसित शहराच्या दृष्टीने या महत्वपूर्ण मागणीला यश आले आहे. यामुळे चांदी उद्योजकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.