मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियावर सोलापूरकरांची नाराजी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार विजयी झाले आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचवेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. तर सुभाष देशमुख यांनी देखील दक्षिण सोलापुरातून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. याशिवाय सचिन कल्याणशेट्टी व समाधान आवताडे यांनीही दोनदा निवडणूक जिंकली आहे. तरीदेखील, यापैकी कोणालाच मंत्रिमंडळात संधी मिळू शकली नाही. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर सोलापूकरांनी नाराजी व्यक्त केली. विशेष बाब म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या जल्लोषाचा कार्यक्रम देखील सोलापूरला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी रद्द केल्याचे पाहायला मिळाले.