कोल्हापूर-पुणे महामार्गावर कामेरी हद्दीत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे तरुण ठार झाले. सर्जेराव सुदाम कांबळे (वय ३५, इंग्रुळ, ता. शिराळा) व अविनाश सर्जेराव दाभाडे (३१, तडवळे, जि.सांगली) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत दीपक आनंदा कांबळे (इंग्रुळ, डोंगरवाडी रोड, ता. शिराळा) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काल रात्री अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, दोघेही मृत तरुण दुचाकीवरून (एमएच १०, ई सी ९३३५) कोरेगाव (ता. वाळवा) येथे कामानिमित्त गेले होते. तेथील काम आटोपून दोघेही काल रात्री अकराच्या सुमारास शिराळा तालुक्यातील आपल्या गावी परत निघाले होते. गावाकडे परतत असताना अज्ञात वाहनाला धडकून अपघात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अपघातात दोघांच्याही डोक्यास गंभीर मार लागून दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. इस्लामपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.