आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंच केसरी बैलगाडा स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.निमसाखर येथील संदेश कांबळे यांचा बैल डमरु तर अतुल सुर्यवंशी यांच्या भारत या बैलजोडीने हे यश मिळवले. निमसाखर गावाच्या इतिहासात हे पहिलेच यश असल्याने या यशाबद्दल निमसाखर चौकात ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. शनिवारी (१४ डिसेंबर रोजी) आटपाडी (जि. सांगली) तालुक्यातील दिघंची जवळील पुजारवाडी येथे सरपंच केसरी बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीसाठी पुणे, सांगली, सातारा, सोलापूर सह अन्य भागातून सुमारे साडेतीनशे बैलगाडा स्पर्धेत सहभागी झाले होते.
या बैलगाडा स्पर्धेसाठी निमसाखर ( ता. इंदापूर) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील संदेश महादेव कांबळे यांचा डमरु या बैलाच्या जोडीबरोबर मोडनिंब ( ता. माळशिरस ) येथील अतुल सुर्यवंशी यांचा भारत या बैलांनी सहभाग घेतला. निमसाखरचा डमरु हा बैल केवळ १८ महिन्यांचा तर भारत हा बैल ४ वर्षांचा आहे.
या बैलजोडीने बैलगाडा शर्यतीत इतिहास घडवून प्रथम क्रमांक पटकावत १ लाख रुपयांच्या बक्षीसाचे मालक मानकरी ठरले. त्यानंतर शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास बैल आणि बैलगाडी भरलेली पिकअप आल्यानंतर गावात तोफांची आतषबाजी, गुलालाची उधळण तर उपस्थितांना साखर वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.