विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. राहुल आवाडे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अनेक विकास कामांना प्राधान्य दिले. महापालिका आणि शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना जातीव्यवस्था न पाहता वारसा हक्क लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांना निवेदन सादर केले. सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय मिळवा यासाठी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
रजपूते यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाच्या विविध विभागांमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू आहे. मात्र इतर मागासवर्गीय ओबीसी आणि बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांना हा हक्क अदयाप मिळत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे हा मुद्दा निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्याची गरज असल्याचे रजपुते यांनी स्पष्ट केले. त्यांनी असेही सांगितले की, न्यायालयीन सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचे दुर्लक्ष होत असून यामुळे तारखा वाढत आहेत आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सर्व जातीय सफाई कर्मचाऱ्यांना समान वारसा हक्क मिळावा अशी मागणी रजपुते यांनी केली.