अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये खूपच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. चोरी, मारामारी, खून, अपघात यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. खानापूर तालुक्यातील नागेवाडी जवळील चिखलहोळ येथे दिवसाढवळ्या चोरट्याने घरफोडी केली आहे. त्यांनी सोन्या-चांदीच्या दागिनेसह रोख रकमेवर डल्ला मारला. रविवारी दुपारच्या दरम्यान घटना घडली आहे. याबाबत विटा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रावसाहेब शंकर निकम मूळ राहणार नागेवाडी वय 64 हे आपल्या पत्नी सोबत चिखलहोळ येथील बाबर मळ्यामध्ये राहतात. त्यांचा मुलगा योगेश जयपुर राजस्थान येथे गलाई व्यवसाय निमित्त बायको मुलांसोबत राहतो.
रविवारी दुपारी ते आपल्या शेजारीच असणाऱ्या शेतात घराला कुलूप लावून गेले. या संधीचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्याने दुपारी दोन ते साडेतीनला घरातील मानस शेतात गेले असताना घराचं लॉक व दोन्ही दरवाजे तोडून घरामध्ये प्रवेश केला.
यात त्यांनी घरातील चार कपाटे फोडून त्यातील सर्व ऐवज लंपास केला. काही वेळानंतर दोघे पती-पत्नी घरी परत आल्यानंतर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसलं व घराचे कुलूप तोडून कोणीतरी चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर लगेचच त्यांनी विटा पोलिसात याबाबत फिर्याद दिली.
यानंतर लगेचच विटा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याच दिवशी सातारा जिल्ह्यातील वडूजवळ तडवळे गावांमध्ये चोरी झाल्याचं समजत आहे. त्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मात्र दिवसाढवळ्या ही चोरी झाल्याने खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे.