इचलकरंजी नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झाल्यापासून गुंठेवारी, बांधकाम परवाने, लेआऊट आदी कामे गतीने होऊन महापालिकेला उत्पन्न मिळण्यासह शहराच्या विकासाला चालना मिळेल असे वाटत होते; पण मागील काही वर्षांपासून ही कामे पूर्णत: बंद पडली आहेत. विशेषत: नगर रचना विभागाकडील दोन रचना सहायक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे या कामांना खीळ बसली आहे. इचलकरंजी महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी हे बांधकाम परवाने देण्यास सातत्याने त्रुटी काढून टाळाटाळ करीत आहेत.
संबंधित कामे थांबल्याने महापालिकेला मिळणारा महसूल थांबला असून शहराचा विकास रोखला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. अशा त्रस्त नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. यासंदर्भात लवकरच आयुक्तांसोबत संबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन आमदार आवाडे यांनी दिले.
याप्रश्नी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी आवाडे यांच्याकडे केली. यावेळी त्यांना निवेदनही सादर केले. शिष्टमंडळात बाळासाहेब कलागते, बाळासाहेब मोहिते, बाहुबली पाटील, प्रमोद लोकरे, अक्षय लोटके, शब्बीर तराळ, सूरज चौगुले, प्रशांत हाके, राजेश मालवणकर, राम चव्हाण, सुधीर शिंदे आदींचा समावेश होता.