इस्लामपूर येथील लोकअदालतीमध्ये ७ कोटी ७३ लाख रुपयांची २८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या निर्देशानुसार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेल्या २१८ प्रकरणामध्ये तडजोड होऊन ७ कोटी ७२ लाख रुपये, तर दावा दाखलपूर्व ६७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १ लाख ८३ हजार रुपये रक्कम वसूल झाल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी यांनी दिली. यामध्ये वाळवा तालुक्यातील सहकारी संस्था, इन्शुरन्स कंपनी, महावितरण, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, नगरपालिका, ग्रामपंचायती, फायनान्स कंपन्या तसेच तालुक्यामधील सर्व पोलिस ठाण्यांनी सहभाग घेतला होता.
या लोकन्यायालयामध्ये पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश वर्ग १ अनिरुध्द गांधी, वर्ग २ चे न्यायाधीश ए. वाय. थत्ते, न्यायाधीश व्ही. जी. चौखंडे, एम. एन. जयस्वाल, पी. पी. ठाकूर, के. एम. चंडालिया यांनी काम पाहिले. पॅनेल सदस्य म्हणून इस्लामपूर वकील संघटनेचे सदस्य अॅड. दिग्विजय डी. पाटील, अॅड. वैभव व्ही. कुलकर्णी, अॅड. व्ही. व्ही. बोंगाळे, अॅड. एस. एम. नवाळे, अॅड. व्ही. आर. चव्हाण, अॅड. एस. एच. हळदे – पाटील यांनी काम पाहिले. लोकअदालतीच्या आयोजनामध्ये इस्लामपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व कर्मचारी व इस्लामपूर वकील संघटनेचे सर्व विधिज्ञ यांनी सहभाग नोंदविला. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तालुक्यातील पक्षकारांनी मोठ्या संख्यने सहभाग नोंदवला. ही लोक अदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष पी. के. शर्मा यांचे अध्यक्षतेखाली झाली.