पेठ-सांगली रस्त्याच्या कामावेळी ठिकठिकाणी रस्ता खुदाईचे काम सुरू आहे. या रस्ता खुदाईच्या कामामुळे पूर्वी केलेल्या सिमेंट काँक्रीट गटारीच्या कामासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या उपलब्ध झाल्याने बेरोजगारांमध्ये फिलगुडचे वातावरण आहे. या सळ्या काढून बेरोजगार तरुण त्या विकून संसाराचा गाडा हाकत आहे. सुरुवातीस आष्टा ते सांगली या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम सुमारे ८० टक्क्यांच्या दरम्यान पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारीचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. तर काही ठिकाणी काम सुरू आहे. या रस्ता कामावेळी पूर्वीच्या गटारी फोडून काढाव्या लागत आहेत.
या सिमेंट काँक्रीटच्या गटारीचे बांधकाम करताना तत्कालीन पालिकेच्या तसेच सार्वजनिक बांधकामाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सध्या या रस्त्याचे काम सुरू असल्याने जुन्या गटारी फोडण्यात येत आहेत. या गटारी जेसीबीच्या साह्याने काढून टाकताना गटारीच्या सिमेंट काँक्रीटसोबत सळ्या निघत आहेत. या लोखंडी सळ्या बेरोजगार गोरगरिबांना रोजगाराच्या साधन बनल्या आहेत. अनेक गोरगरीब या सिमेंट काँक्रीटमधील सळ्या गोळा करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. रस्त्याचे काम सुरू झाले की, ज्या ठिकाणी लोखंडी सळ्या, अँगल, तारा मिळतील त्याठिकाणी एकत्र येऊन एक्साब्लेडच्या साह्याने या सळ्या कापून काढत आहेत. या गोळा केलेल्या सळ्याच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने ज्याठिकाणी सळ्या मिळतील त्याठिकाणी नजर ठेवून ते आपल्या पोटाची खळगी भरत आहेत.