इस्लामपुरात बहुभाषिक कवी संमेलन

इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्याल आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातर्फे बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दीड तास रंगलेल्या कवी संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय करणारे मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हरवून गेले. यावेळी भाषा उत्सव दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि तमिळ भाषेतील भारतीय पातळीवरील कवी सुब्रमण्यम भारती उर्फ महाकवी भारती यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय भाषा उत्सव दिन साजरा करण्याबाबत मुक्त विद्यापीठाकडून अभ्यास केंद्रांना सूचित करण्यात आले होते. लोकांमध्ये मातृभाषेच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे, जगभरात भाषिक व सांस्कृतिक परंपरांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बहुभाषिक लोकांमध्ये अखंडतेची भावना निर्माण करणे, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू होता.

यावेळी अभ्यास केंद्रातर्फे जगभरासह भारतीय पातळीवरच्या विविध भाषांमधील निवडक कवितांच्या वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रा. संभाजी पाटील, प्रा. अश्विनी थोरात, प्रा. अनिता करांडे, प्रा. वैशाली जाधव, प्रा. किरण मेनकुदळे, प्रा. शुभम गायकवाड, प्रा. सुशांत सलगर, प्रा. वर्षा चव्हाण, प्रा. शुभांगी घाटगे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांसह भारतीय भाषांतून मराठीत अनुवादित झालेल्या कवितांचे वाचन केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी कवी संमेलनामागची भूमिका कथन केली. प्रा. संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत पाटील यांनी आभार मानले. विजय कांबळे यांनी संयोजन केले. भारतीय भाषा उत्सव दिनानिमित्त मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातर्फे कर्मवीर महाविद्यालयात आयोजित कवी संमेलनात प्रा. अश्विनी थोरात यांनी कविता सादर केल्या. यावेळी प्रा. एकनाथ पाटील, प्रा. किरण मेनकुदळे, अभिजीत पाटील, प्रा. संभाजी पाटील, प्रा. वैशाली जाधव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.