पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी बाण सोडला

 राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असताना पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवरायांची माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदींच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रतिहल्ला केला. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जी घटना घडली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. मात्र,  जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांना फटकारले. त्यांनी म्हटले की, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे मोदींनी माफी मागूनही महाविकास आघाडी या मुद्द्यावरुन माघार घ्यायला तयार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही सिंधुदुर्गातील घटनेबद्दल जाहीर माफी मागितली होती. तसेच पुढील काही दिवसांत राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा उत्कृष्ट पुतळा उभारु. त्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शेजारची खासगी जमीनही अधिग्रहीत केली जाणार आहे. शिवरायांचा नवा पुतळा भव्य आणि उत्तम दर्जाचा असेल. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिल्पकार  राम सुतार यांच्यात बोलणी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.