इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेमध्ये जाेरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार मुंबईत तळ ठोकून आहेत. तर गौरव नायकवडी यांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. इस्लामपूर मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनावरून आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी आघाडी उघडली आहे. दोघांनीही महायुतीच्या उमेदवारीवर दावा केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी मुंबईत तळ ठोकून आहेत. इस्लामपूर मतदारसंघात परत येताना आपण उमेदवारी घेऊनच येऊ, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे गौरव नायकवडी यांनीही वाळवा येथील विकास कामांच्या उद्घाटनावरून जयंत पाटील यांना काळे झेंडे दाखवत विरोध केला आहे. आपणच मतदारसंघात शिवसेनेकडून दावेदार असल्याचा अप्रत्यक्षपणे नायकवडी यांनी दुजोरा दिला आहे. एकंदरीत आगामी विधानसभेच्या रणांगणात आमदार जयंत पाटील यांनी आपली फौज इस्लामपूर मतदारसंघात उतरवली आहे.
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इस्लामपूर-आष्टा परिसरात मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनांचा श्रीगणेशा केला आहे. याउलट महायुतीकडून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांनीही विकास कामांची उद्घाटने करत आमदार जयंत पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतदारसंघात विकासाचे पर्व सुरू करून उद्घाटनांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे सध्यातरी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीकडून उमेदवार कोण असणार? याबाबत अनिश्चितता आहे.