कुंभोज बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावावा ग्रामस्थांच्यातून मागणी…….

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित असणारा बायपास रस्त्याचा प्रश्न कधी निकाली लागणार, याकडे कुंभोज ग्रामस्थांचे लक्ष वेधले असून गेल्या वर्षी हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या मध्यस्थीने
सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले होते. पण तेथील काही शेतकऱ्यांच्या वादग्रस्त परिस्थितीमुळे ते काम पुन्हा एकदा रखडले असून सदर शेतकऱ्यांची मध्यस्थी करून शासनाने व कुंभोज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली लावावा, अशी मागणी कुंभोज ग्रामस्थांच्यातून होत आहे.  बायपास रस्ता नसल्याने कुंभोजमध्ये वाहतूक करत असताना अनेक नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी तासनतास जाम होणारे ट्राफिक व त्या ट्राफिकमध्ये काल माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही तब्बल एक तास पेक्षा जास्त काळ वाहतूक समस्येचा सामना करावा लागला.

अनेक विद्यार्थी सर्वसामान्य नागरिकांना अशाच पद्धतीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे.त्यामुळे कुंभोज ग्रामपंचायत व शासनाने तात्काळ सदर गोष्टींचा पाठपुरावा करून कुंभोज बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढून सध्या चालू असलेली ऊस वाहतूक व अवजड वाहनांची वाहतूक बायपास रस्त्याने सुरू करावी, अशी मागणी सध्या ग्रामस्थांतून जोर धरत आहे.

लोकप्रतिनिधींनी कुंभोज बायपास रस्ता, तसेच गावातील शासकीय जागेवरती असणाऱ्या विविध समस्येवरती आवाज उठवावा अशी भावना नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे. सदर बायपास रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, माजी सरपंच प्रकाश पाटील अग्रेसर असल्याचे चित्र दिसत आहे.