काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथ विधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी झाला.आता मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांची बेरीज केली तर हा आकडा ४२ इतका होतो. कायद्यानुसार महाराष्ट्रात ४३ मंत्रीपदांची तरतूद आहे. असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतला एक मोठा नेता महायुतीत जाणार असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे अमोल मिटकरींनी हे मंत्रिपद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी हे मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. अमोल मिटकरींनी राखीव मंत्रिपद हे जयंत पाटील यांच्यासाठी ठेवल्याचा दावा केला होता.
मात्र अमोल मिटकरींच्या या दाव्याला जयंत पाटील यांनी सुद्धा चांगलंच उत्तर दिल्याचं पाहायला मिळाले.अधिवेशन सुरु झाल्यापासून जयंत पाटील हे महाविकास आघाडीमधल्या नेत्यांपासून काहीसे लांब असल्याचे पाहायला मिळालेत. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये जयंत पाटील हे अनुपस्थित होते. गेल्या तीन दिवसांपासून विधानभवनात असूनही विरोधकांच्या पायऱ्यांवरील आंदोलनात त्यांनी एकदाही सहभाग घेतला नाही.
जुने सहकारी समोर बाकावर मंत्रिपदावर बसलेले असताना, विरोधी बाकावर जयंत पाटील यांचं मन रमत नाही का, अशी चर्चा सुरु झाली आहे. राजकारणात जे दिसत ते बऱ्याचदा नसत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात नेमकं आहे तरी काय, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.