स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिद्दीने नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे; मा. आम. मानसिंगराव नाईक

वाळवा तालुक्यातील गोळेवाडी येथील जनाई गार्डनमध्ये शिराळा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. विधानसभेतील पराभवाने खचून न जाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार संघात ताकद कोणाची जास्त हे विरोधकांना दाखवून देण्याच्या जिद्दीने नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील हे प्रमुख उपस्थितीत होते. मानसिंगभाऊ म्हणाले, निवडणुकीत जय पराजय हा ठरलेला असतो.

पराजयातून खूप काही शिकायचे असते. म्हणून विरोधकांना उघडे पाडण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत आपली ताकद कार्यकर्त्यांनी दाखवून  द्यावा. त्यासाठी पराभवाने नाराज न होता नेटाने कामाला लागावे. प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा राहूया.  माजी राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, आपण प्रचार यंत्रणेत कमी पडलो नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने जिद्दीने काम केले. निवडणूक मोठ्या फरकाने जिंकायची अपेक्षा होती. मानसिंगभाऊंनी दोन हजार कोटी रुपयांवर मतदार संघात विकासकामे केली. जनसंपर्कही मोठा होता. मात्र विकास कामांचे मतात परिवर्तन झाले नाही.आगामी निवडणुकांत यश मिळवून आपली ताकद दाखवून देवूया. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत.

जिल्हाध्यक्ष देवराज पाटील म्हणाले, प्रत्येक गावात मतदान केंद्रनिहाय बाजूला गेलेल्या मतदानाचे चिंतन करणे गरजेचे आहे. मरगळ झटकून, चुका सुधारून आगामी काळातील संघर्षासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक म्हणाले, निवडणुकीतील पराभवाने थांबून चालणार नाही. आपण पुरोगामी विचारांचे पाठीराखे आहोत. लोकशाही टिकवून ती जोपासणे जबाबदारी आपणा प्रत्येकावर आहे. शिराळा, वाळवा तालुक्याची भूमी क्रांतिकारकांची आहे. आगामी काळात क्रांती घडवून पुन्हा विजय मिळवू.