नायब तहसीलदारासह १३ पदे रिक्त ; कर्मचाऱ्यांवर वाढतोय कामाचा ताण 

सांगोला तहसील कार्यालयातील आस्थापनेवरील मंजूर ३५ पैकी १३ पदे रिक्त आहेत. नायब तहसीलदार, महसूल अधिकारी व शिपाई यांच्या रिक्त पदामुळे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तहसील कार्यालयातील तहसीलदार – १ नायब तहसीलदार – ३ पुरवठा निरीक्षण अधिकारी – १ सहायक महसूल अधिकारी – ८ महसूल सहायक १७ अशी एकूण सुमारे ३० पदे मंजूर आहेत तसेच तहसील कार्यालयातील आस्थापनेवर नायब तहसीलदार यांच्या मंजूर ३ पदांपैकी २ भरली असून १ रिक्त आहे तर सहायक महसूल अधिकारी यांच्या मंजूर ८ पैकी ८ पदे भरली आहेत.

महसूल सहायक यांच्या मंजूर १७ पैकी ९ पदे भरली असून ८ पदे रिक्त आहेत. शिपाई मंजूर ७ पैकी ३ भरले असून ४ रिक्त असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले. तहसील कार्यालय सांगोला येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत सांगोला तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयाच्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी तहसील कार्यालयातील मंजूर व रिक्त पदांसह मनुष्यबळ कमतरता व इतर सोयी सुविधा बाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शासन स्तरावरून लवकरच रिक्त पदे भरली जातील, असे आश्वासित केले.