सांगोला डाळिंबाची पहिली व्यावसायिक खेप समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला नुकतीच रवाना केली. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या झेंड्याखाली आयएफसी सुविधा, एमएसएएमबी, वाशी (नवी मुंबई) येथील आयएनआय फार्म्सद्वारे ही खेप पाठवण्यात आली.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी डाळिंबाच्या 4200 पेट्यांच्या (12.6 टन) खेपेला हिरवा झेंडा दाखवला.
महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ (एमएसएएमबी), प्रादेशिक वनस्पती विलगीकरण केंद्र (आरपीक्यूएस-एमओए आणि एफडब्ल्यू), राज्य कृषी विभाग (महाराष्ट्र सरकार), एनआरसी डाळिंब, अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि आयएनआय फार्म्सचे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
अपेडाने गेल्या वर्षी तांत्रिक भागीदार म्हणून आयसीएआर-एनआरसी डाळिंब सोलापूरच्या सहकार्याने किरणोत्सर्ग प्रक्रिया आणि स्थिर चाचणीसह डाळिंबाची हवाई खेप यशस्वीरित्या पाठवली होती. या यशस्वी प्रयोगानंतर, अपेडाने भारतीय डाळिंबाच्या संभाव्य बाजारपेठेसाठी सागरी व्यापार संबंधाच्या माध्यमातून डाळींब पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
अपेडा नोंदणीकृत आयएनआय फार्म्सने या प्रायोगिक हवाई खेप, सागरी खेप आणि सागरी कंटेनरचे कार्यान्वयन केले आहे. ही कंपनी भारतातील फळे आणि भाज्यांचे सर्वोच्च निर्यातदार असून त्यांची उत्पादने जगभरातील 25हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक बाजारपेठेतील कठोर मानकांची पूर्तता करण्यासाठी, डाळिंबाची गुणवत्ता आणि साठवण वाढवण्याकरता व्यापक प्रयत्न केले आहेत. एग्रोस्टार समूहाचा एक भाग म्हणून, आयएनआय फार्म्सने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत थेट काम करून डाळिंबासाठी मूल्य साखळी स्थापन केली आहे.
महाराष्ट्रातील सांगोला येथील अनार्नेट नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून ही डाळिंब घेतली आहेत. इतर निर्यात बाजारांच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता 20 टक्के आणि देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत 35 टक्के होता, हे लक्षणीय आहे.