Rain Alert: राज्यात बुधवारपासून चार दिवस पावसाची शक्यता

उत्तर भारताकडून थंड वारे अन् दक्षिणेतून येणारे बाष्पयुक्त वारे यांची टक्कर राज्यावर होत आहे. त्यामुळे वरच्या थरांत झोतवारा (जेट स्ट्रीम विंड) वेगाने वाहत आहे. हे वारे वातावरणाच्या खालच्या थरांतही येत असल्याने राज्यात बोचरे वारे, दाट धुके अन् पावसाचे वातावरण तयार झाले असून बुधवारपासून चार दिवस काही भागांत हलक्या सरींचा अंदाज आहे.तीन ते चार दिवसांपासून राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानाचा सरासरी पारा 9 ते 10 वरून 18 ते 22 अंशांवर गेला. तरीही गारठा जाणवत आहे. याचे कारण झोतवार्‍याचा वाढलेला प्रभाव हे आहे. उत्तर भारत गारठला असून जम्मू-काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत.

महाराष्ट्रात मात्र उत्तर व दक्षिण भागातून येणार्‍या वार्‍यांची टक्कर होत असल्याने विचित्र वातावरण तयार झाले आहे. तापमानात वाढ होऊनही वरच्या थरातील वारे, दाट धुके अन् पाऊस असे वातावरण 25 ते 29 पर्यंत राहण्याची शक्यता आहे. सध्या धुळे, नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात इतर भागातही पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.