नव्या वर्षात विठ्ठल पूजेचे ऑनलाईन बुकिंग; १ जानेवारीपासून होणार सुरवात

विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे काही भाविक हे पूजा करत असतात. यासाठी विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आता नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवीन वर्षात हि सुविधा सुरु करण्यात येत असून १ जानेवारीपासून भाविकांनी पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाईन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी यंत्रणा देखील कार्यान्वीत केली आहे. नव्या वर्षातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजांचे बुकिंग हे ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या नव्या संगणकीय प्रणालीमुळे वशिलेबाजीला चाप बसणार आहे. भाविकांमधून मंदिर समितीच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

तीन महिन्यासाठी बुकिंग

पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठी हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यासाठी येत्या १ जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरु केली जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावरच हि ऑनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

घरी बसल्या करता येणार नोंदणी

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नव्याने सुरु केलेल्या या प्रणालीचा भाविकांना फायदा होणार आहे. आतापर्यंत भाविकांना पूजेची बुकिंग करण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागत होते. किंवा थेट पूजेसाठी जाताना प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र भाविकांना आता घर बसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे. यामुळे दिलेल्या दिवशी भाविकांना थेट हजर रहावे लागेल.