वाळवा येथे जोरदार पावसामुळे शाळेची भिंत कोसळली! जीवितहानी टळली

वाळवा तालुक्यातील भाटवडे येथे जोरदार पावसामध्ये जिल्हा परिषद शाळेची रात्री आठच्या दरम्यान संरक्षक भिंत कोसळली. रात्रीची घटना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाटेगाव, काळमवाडी रस्त्याकडेला जिल्हा परिषदेची शाळा आहे. रस्त्याकडेला शाळेची ८० फूट लांब व ६ फूट उंच अशी दगडी संरक्षण भिंत उभी होती; परंतु गेली दोन ते तीन दिवस झाले परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. कालही संध्याकाळी जोरदार मुसळधार पाऊस सुरू होता.

रात्री आठच्या दरम्यान सगळीच संरक्षक भिंत रस्त्यावरती कोसळली. भिंत कोसळण्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. रात्रीची वेळ असल्याने जोरदार पावसामुळे रस्त्यावरती रहदारी नसल्याने व शाळा बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संबंधित विभागाने त्वरित याकडे लक्ष देऊन संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी उपसरपंच अमोल देवकर ग्रा.पं. सदस्य सचिन डोंगरे व ग्रामस्थ यांनी केली आहे.