IPL 2025 : आयपीएल 2025 स्पर्धेची तारीख आली समोर! अंतिम फेरीसाठी असं असेल गणित

आयपीएल 2025 अर्थात 18व्या पर्वासाठी दहा संघ सज्ज झाले आहेत. काही फ्रेंचायझींनी अजून आपले कर्णधार निश्चित केलेले नाहीत. असं असताना आयपीएलची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. 14 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल अशी सूत्रांची माहिती आहे. तर अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. आयपीएल 2024 स्पर्धा अर्थात 17 व्या पर्वाची सुरुवात 22 मार्च 2024 रोजी झाली होती. साखळी फेरीचे सामने 19 मे रोजी संपले होते. तर प्लेऑपच सामने 21 मे ते 24 मे दरम्यान झाले. त्यानंतर 26 मे रोजी अंतिम सामना झाला होता.

आयपीएल 2025 अंतिम फेरीचा सामना 25 मे रोजी होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचला नाही तर तारखेच बदल होण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना 11 जूनपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धा दोन आठवडे आधीच पूर्ण करण्याचा आयोजकांचा मानस आहे.

पण भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली नाही तर स्पर्धा मे अखेरपर्यंत खेळण्याची शक्यता आहे.आयपीएलमधील पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि उपविजेता सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना 14 मार्चला होण्याची शक्यता आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, वुमन्स लीग स्पर्धा 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. आयपीएल आणि डब्ल्यूपीएल स्पर्धेत एका आठवड्याचं अंतर ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीग 9 मार्चला संपेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमीना फेब्रुवारीपासून मे पर्यंत टी20 क्रिकेटची पर्वणी मिळणार आहे.