अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. खून, मारामारी तसेच अनेक फ्रॉडच्या घटना घडत असतानाचे चित्र दिसतच आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. प्लॉटचे सामिलीकरण करून देण्यासाठी 75 हजारांची मागणी करणार्या इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी (सध्या रा. फॉर्च्युन अव्हेन्यू इचलकरंजी, मूळ रा. जयसिंगपूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी अटक केली. संशयित कोळी यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेने नगर भूमापन कार्यालयातील खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. मौजे शहापूर येथे गट नं. 454, सि.स.नं. 19021 मध्ये प्लॉट नं. 27, 28, 29 आणि 30 असे तक्रारदार व त्यांच्या सहहिस्सेदारांच्या मालकीचे प्लॉट आहेत. यापैकी 27 व 28 आणि 29 व 30 प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी त्यांनी नगर भूमापन अधिकारी कार्यालयाकडे जुलै मध्ये अर्ज केला होता.
हे अर्ज या कार्यालयातील एका कर्मचार्याकडे असल्याने तक्रारदाराने त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने दोन्ही अर्ज व प्रकरणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर कार्यालयाकडे पाठवून त्याची प्रत तक्रारदारास दिली. सप्टेंबरमध्ये त्या कर्मचार्याने तक्रारदारास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अर्ज ज्या टेबलावर आहेत त्याचा पदभार आपल्याकडे असल्याचे सांगितले व अर्जावर मंजुरी आणण्यासाठी वरिष्ठांसाठी 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.या अनुषंगाने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
त्यानुसार तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये संबंधीत कर्मचार्याने वरिष्ठ नगरभूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना भेटण्यास सांगितले. कोळी यांनी काम करुन आणण्यासाठी वरिष्ठांसाठी तक्रारदाराकडे 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचासमक्ष पडताळणीत निष्पन्न झाले. त्यामुळे लाच मागितल्याच्या कारणावरून संशयीत कोळी याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सोमवारी अटक करण्यात आली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील, पोलिस निरीक्षक बापू साळुंके, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे, पोहेकॉ संदीप काशिद, सचिन पाटील, सुधीर पाटील, पूनम पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.