Maharashtra Politics : निवडणुका झाल्या आता राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लवकरच बदलणार?

राज्यात महायुती सरकारचे खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. भाजप, काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटातही निवडणूक निकालानंतर नेतृत्व बदलाच्या चर्चांना जोर आला होता.

भाजप: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपात एक व्यक्ती, एक पद असे धोरण असल्याने बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. पुढील वर्षी 12 जानेवारीला पक्षाचं अधिवेशन असून या अधिवेशनात पक्षाला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भाजपमधून माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.

काँग्रेस : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणूकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळं कॉंग्रेसला लवकरच अध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विजय वड्डेटीवार यांची नावे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची या अगोदरच टर्म पूर्ण झाली आहे. त्यातच पक्षाचा विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यामुळं पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट: राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वात पक्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. लोकसभा निवडणूकीत पक्षाला मोठा फटका बसला पण विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोठं यश मिळालं. त्यामुळं तटकरे यांची पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे.