इचलकरंजीत विवाहितेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या; पतीसह चौघांविरोधात गुन्हा

इचलकरंजी शहरात अनेक गुन्हेगारी प्रकार तसेच चोरीच्या घटना घडतच असतात. खून, अपघात यांच्या देखील घटना वरचेवर कानी पडतच असतात. अलीकडे आम्तह्त्या प्रकारात देखील वाढ झालेली आहे. वेगवेगळ्या कारणामुळे अनेक जण आपल्या जीवाशी खेळतात. लग्नात मानपान केले नसल्याच्या कारणावरून आणि जागा खरेदीसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी पतीसह सासरकडील लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सौ. निकिता सत्यम केसरवाणी (वय २३, रा. सुर्वेनगर गल्ली नं. २) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती सत्यम मुनीमचंद केसरवाणी, सासू विमल केसरवाणी, सासरा मुनीमचंद केसरवाणी आणि दीर सोनू केसरवाणी (सर्व रा. सुर्वेनगर ग.नं. २) या चौघांवर गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद सौ. राजकुमारी संजयचंद केसरवाणी (वय ४१, रा. नारळ चौक, इचलकरंजी) यांनी दिली आहे. पोलिसांनी संशयित सत्यम आणि मुनीमचंद केसरवाणी या दोघांना अटक केली आहे.

सत्यम आणि निकिता यांचा सन २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहाच्या काही दिवसानंतर निकिता हिचा तिच्या सासरच्यांनी छळ सुरू केला. लग्नात योग्य मानपान केला नाही या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. जागा घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी तिच्याकडे सतत तगादा लावला जात होता.

या छळाला कंटाळून निकिताने बुधवारी पहाटे बेडरूममध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निकिता ही चार महिन्यांची गर्भवती होत्या. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. तिच्या मृत्यूस सासरकडील पतीसह चौघेजण कारणीभूत असल्याची तक्रार सौ. राजकुमारी केसरवाणी यांनी रात्री दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वायदंडे करीत आहेत.