हातकणंगलेत वाहतूक कोंडी; वैतागले वाहनचालक

सध्या अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पहावयास मिळतेच. रस्त्यांची दुरावस्था यामुळे देखील वाहनधारक वैतागले आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळतात. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. सांगली-कोल्हापूर रोडवरील हातकणंगले ते मजले फाट्यापर्यंत रोजच्या वाहतुक कोंडीला वाहनचालक वैतागले आहेत. हातकणंगलेच्या मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या सांगली-कोल्हापूर रोडवर मानाचा फाकड्या पुल ते तहसील कार्यालयापर्यंत प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असते.

सायंकाळच्यावेळी तास तासभर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.सध्या ऊस वाहतूक करणाच्या अवजड वाहनांची संख्या देखील वाढल्यामुळे गेल्या महिनाभरापासून प्रचंड वाहतुक होत आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही या कोंडीत सापडले. त्यांनाही याचा मनस्ताप झाला. त्यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावल्यानंतर बुधवारी सकाळी पोलीसांनी रोडलगतच्या हॉटेल, बार आणि अन्य व्यवसायिकांना रस्त्यावर लावण्यात आलेले बोर्ड काढून घेण्याच्या सुचना केल्या. तर वाहतुक कोंडीला प्रमुख कारण बनलेले रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ विक्रेत्यांना हटविण्यात आले.पण सायंकाळी पुन्हा फळविक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा ठाण मांडल्याचे चित्र होते. यामुळे पोलीसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.