योगींचा घणाघात….

काँग्रेसने (Congress) अयोध्येत श्री रामाचे, मथुरेत श्री कृष्णाचे आणि वाराणसीत काशिविश्वेश्वराचे अस्तित्व नाकारले. त्यांनी देशातील सनातन परंपरेचा नेहमीच अपमान केला.मतांच्या राजकारणासाठी गो हत्येचे समर्थन केले. हिंदू आतंकवाद अशी खोटी संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न केला, अशा काँग्रेस आणि त्यांचे सहकारी असलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मत देणे हे महापाप आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.शिवसेनेचे धनुष्यबाण दिल्लीत पाठवण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

इचलकरंजी येथील थोरात चौकातील खवरे मार्केट येथे झालेल्या महागर्जना सभेमध्ये ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही सभा घेतली. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, ”जगाला शांतता आणि समृद्धीचा संदेश देणारी सनातन परंपरा आपली विरासत आहे. या सनातन परंपरेने संपूर्ण भारताला जोडले आहे. त्यामुळेच राममंदिराचा लोकार्पण सोहळा अयोध्येत झाला. त्या दिवशी महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिराचे स्वप्न अयोध्येत पूर्ण झाले. कॉंग्रेसने हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या गायीच्या कत्तलीचे समर्थन केले. काँग्रेसने केवळ स्वप्ने दाखवली, पण पंतप्रधान मोदी यांनी ती सत्यात उतरवली. इंदिरा गांधी यांनी ”गरिबी हटाव’चा नारा दिला. त्यांचे नातू राहुल गांधीही गरिबी हटाव असेच अद्यापही म्हणत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खाती उघडली. आता अनुदानाची, योजनांची रक्कम थेट खात्यात जमा होते. त्यामुळे एजंटगिरी संपली. देशामध्ये महामार्ग, विमानतळ, रेल्वे अशा पायाभूत सुविधांचा गतीने विकास झाला आहे. आता आपल्यावर दहशतवादी हल्ले होत नाहीत. कारण नवा भारत हल्ले सहन करत नाही, तर घरात घुसून उत्तर देतो. काश्मीरचे ३७० कलम मोदींनी हटवले. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले. मोदी जे बोलतात ते करतात, म्हणूनच त्यांना लोक निवडून देतात. त्यामुळेच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देऊन रामाच्या हातातील धनुष्यबाण दिल्लीमध्ये पाठवा.”