घरात घुसून महिलेचे दागिने चोरणार्‍याला नागरिकांचा बेदम चोप, गावात उडाली एकच खळबळ

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे घरात घुसून सुवर्णा राजेंद्र साळोखे (वय 55) या महिलेचे तोंड उशीने दाबून गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण लंपास करण्याचा प्रयत्न करणार्‍या अमित दत्तात्रय वायदंडे (वय 25, रा.येडेनिपाणी, ता. वाळवा) या चोरट्यास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. ही घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.

गावतलावाजवळ प्रवीण साळोखे यांचे घर आहे. रात्री आठच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने अमित वायदंडे हा घराच्या दुसर्‍या मजल्यावर पोहोचला. यावेळी हॉलमध्ये सुवर्णा साळोखे या एकट्या पलंगावर बसून टीव्ही पाहत होत्या. वायदंडेने दरवाजा कडी लावून बंद केला व सुवर्णा साळोखे यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण तोडले. साळोखे यांचा जीव गुदमरू लागल्याने चोरट्याच्या हाताचा चावा घेत मदतीसाठी धावा केला. यावेळी रस्त्यावर थांबलेल्या प्रवीण साळुंखे, उदय चौगुले, महेश माळकर यांनी दुसर्‍या मजल्यावर धाव घेतली.

त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता साळोखे यांच्या तोंडावर चोट्याने उशी दाबून धरल्याचे निदर्शनास आले. सुवर्णा यांची सुटका करत तिघांनीही चोरट्यास चांगला चोप देऊन कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. या झटापटीमध्ये सुवर्णा साळोखे किरकोळ जखमी झाल्या. कोडोली पोलिसांनी वायदंडेला अटक केली आहे. या प्रकाराने कोडोली गावात एकच खळबळ उडाली आहे.