आगामी विधानसभा निवडणुकी करता जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडून मागणी करण्यात आली होती. पण महायुतीच्या धोरणामुळे येथील विद्यमान आमदार भारतीय जनता पक्षाकडे असल्याने या जागेवर त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. इचलकरंजी शहराच्या दहा वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चोपडे यांनी प्रचंड प्रयत्न केलेले होते.
त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा विश्वास असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवावी यासाठी जनमताचा आग्रह लक्षात घेऊन त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नेतृत्वाकडे सादर केलेला आहे. या घडामोडीमुळे विठ्ठल चोपडे निवडणूक लढवणार की त्यांच्यावर पक्षाचा दबाव येऊन ते या निवडणुकीत माघार घेणार हा प्रश्न आता संपुष्टात आलेला असून आगामी निवडणुकीत चोपडे हे उमेदवार असणार हे आता स्पष्ट झालेले आहे.
आगामी इचलकरंजी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याने महायुतीतल्या घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर राहणे हा विरोधाभास आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा आदर ठेवून नाईलाज म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.
पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावे ईमेल करून तसेच त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पोहोचवण्यासाठी औद्योगिक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती विठ्ठल चोपडे यांनी दिली.