PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी ‘या’ 2 गोष्टींची करा पूर्तता

शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला (Farmers) स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, या योजनेचा 19 हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला महत्वाच्या दोन गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी ही एक अनिवार्य प्रक्रिया आहे, जी आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरद्वारे किंवा सीएससी केंद्रावरून बायोमेट्रिक मार्गाने पूर्ण केली जाऊ शकते. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल किंवा काही उणीव असेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. यासाठी तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन माहिती पाहू शकता.

जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते त्यांच्या केवायसीची स्थिती तपासू शकतात. यासाठी त्यांना pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे फार्मर्स कॉर्नर दिसेल. यामध्ये पहिला पर्याय ई-केवायसी असेल. त्यावर क्लिक करा. यानंतर ओटीपी आधारित ई-केवायसी लिहिले जाईल आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची स्थिती कळेल. KVEC अपूर्ण असल्यास तुम्ही ते अपडेट करू शकता.

केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दर चार महिन्यांनी मिळते. चार महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBT अंतर्गत पोहोचते. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.46 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता लवकरच 19 वा हप्ता देखील जमा होणार असल्याचं बोललं जात आहे.