बड्या कंपन्यांकडून अधिक वजनाच्या कुक्कुट पक्ष्यांचा पुरवठा बाजारात करून दर पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
त्यामुळेच गेल्यावर्षी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजी येत दर १०५ रुपये किलोवर पोहोचले असताना यंदा अवघ्या ६५ रुपये किलो दराने पक्ष्यांचा पुरवठा करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.पोल्ट्री व्यवसायावर सध्या पूर्णपणे कंपन्यांनी नियंत्रण मिळविल्याची स्थिती आहे. करारावर असा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना एका दिवसाचे पक्षी, खाद्य तसेच मेडिसिनचा पुरवठा केला जातो. त्यानंतर पक्ष्याचे अपेक्षित वजन मिळाल्यानंतर त्याची खरेदी कंपन्या करतात.
दोन किलो वजनापर्यंतचा पक्षी मिळविण्यासाठी अधिक खाद्य लागते. तुलनेत त्यापेक्षा अधिक वजन मिळविण्यकरिता कमी खाद्य लागते. त्यामुळे कंपन्या अधिक वजनाच्या पक्ष्याची उचल करून त्याचा बाजारात पुरवठा करतात. अधिक वजनाच्या पक्ष्याचे मांस चवीला योग्य राहत नाही.
त्यासोबतच त्यातील पौष्टिक घटकही कमी होतात, असा निष्कर्ष ‘माफसू’ने संशोधनाअंती नोंदविला आहे. बाजारातदेखील अधिक वजनाचे पक्षी आल्याने मागणी कमी होत दर कोसळतात. परिणामी वैयक्तिकस्तरावर शेतीपूरक व्यवसाय म्हणून याकडे वळलेल्या शेतकऱ्यांची कोंडी होते. कंपन्या त्यांच्याकडील एक दिवसाचे पक्षी वापरतात, पशुखाद्यदेखील त्यांच्या फिडमिलचे असते.
परिणामी त्यांचा नफा अधिक राहतो. पोल्ट्री व्यवसायिक मात्र ४० रुपयांत एक पक्षी खरेदी करतो.पूर्ण वाढ होईपर्यंत त्यावर ९० रुपयांचा खर्च होतो. आता ६५ रुपये घाऊक दराने बाजारात पुरवठा करावा लागत असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील शक्य होत नसल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
किरकोळ बाजारात ग्राहकांना मात्र १७० ते २०० रुपये दराने ब्रॉयलर कोंबडी खरेदी करावी लागत आहे. विदर्भात पोल्ट्री व्यवसायात ५०० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातील ४०० कोटींचा व्यवसाय हा ब्रॉयलर कोंबडीचा आहे.
महिन्याला २५ लाख कोंबड्यांची सरासरी विक्री होते, असे या क्षेत्रातील व्यापारी सूत्रांनी सांगितले.गेल्यावर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला १०५ रुपये किलोचा दर होता. आता मात्र कंपन्यांनी अधिक वजनाच्या पक्ष्यांचा पुरवठा केल्याचा परिणाम बाजार पाडण्यावर झाला. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दर ६५ रुपये किलोवर आले आहेत.