इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पेठ – सांगली महामार्गाला कर्मवीरांचे नाव देण्याची मागणी

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून पेठ- सांगली हा राष्ट्रीय महामार्ग जातो. कर्मवीर अण्णांचे मूळ गाव ऐतवडे बुद्रुक हे या मतदारसंघात आहे. पेठ – सांगली या राष्ट्रीय महामार्गाला शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी येथे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. येथील बस स्थानक चौकात हा अभिनव उपक्रम राबविला. याचे आयोजन येथील शिवसम्राट फौंडेशनने केले होते.

आष्टा शहर व परिसरातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यात सहभाग नोंदवला. फौंडेशनचे अध्यक्ष महेश गायकवाड म्हणाले, शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महाराष्ट्राची शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक उन्नती होण्यासाठी मोठे योगदान आहे. या महामार्गास त्यांचे नाव दिल्यास, त्यांना मानवंदना ठरणार आहे.  पेठ-सांगली रस्त्याशेजारील सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषदांचे ठराव घेऊन नव्या महामार्गास कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे शेवटी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात पेठ- सांगली महामार्गाला कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव मिळेल अशी आशा पल्लवित झाली आहे.