राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष आणि सदस्यपदांच्या जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक जाहीर केली होती.
त्यासाठी १ डिसेंबर २०२५ रोजी आणि काही नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.
या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष अनेक ठिकाणी आमने-सामने आले होते. त्यामुळे राजकारण आरोप-प्रत्यारोपाने चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणात महत्वाचा मानला जातो. त्या पार्श्वभूमीवर या नगरपरिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे किती नगराध्यक्ष झाले? याची यादी जाणून घेऊयात.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांची यादी!
नगरपरिषद नगराध्यक्ष विजेता पक्ष
भोकरदन समीना मिर्जा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
काटोल अर्चना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
माजलगाव शिफा बिलाल चाऊस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
उरण भावना घाणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
इस्लामपूर आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
अष्टा विशाल शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष झाले?
महाराष्ट्रात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे ११७ नगराध्यक्ष निवडून आले, तर सत्तेतील त्यांचे मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेचे ५३ नगराध्यक्ष निवडून आले. महायुतीतील तिसरा मित्रपक्ष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळाला. विरोधकांपैकी काँग्रेसचे सर्वाधिक २८, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ तर ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ नगराध्यक्ष निवडून आले. इतर पक्षीयांच्या उमेदवारांनी ३७ ठिकाणच्या नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची बाजी
राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्षच आमने-सामने आले होते. त्यामुळे महायुतीमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, तरी देखील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारली. महायुतीला २०७ आणि महाविकास आघाडीला ४४ आणि स्थानिक आघाडीला (इतर) ३७ नगरपरिषद व नगरपंचायती जिंकण्यास यश मिळालं.
