प्रजासत्ताक दिनापासून हातकणंगलेत आमरण उपोषणाचा नगरसेविका रोहिणी खोत यांचा इशारा……

अनेक भागात गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झालेली पहायला मिळत आहे. अनेक भागात कामासाठी मुदतवाढ मागितली जाते. भ्रष्टाचारी प्रवृत्ती देखील जोर धरत आहे. त्यामुळे याचा प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागतो. अनेक भागात भोंगळ कारभारासाठी तीव्र नाराजी देखील व्यक्त होत असतानाचे चित्र दिसत आहेत. असाच एक प्रकार हातकणंगले तालुक्यात उघडकीस आलेला आहे. चक्क नगरसेविका यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. हातकणंगले नगरपंचायत भ्रष्ट मुक्त कारभारासाठी तसेच झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या २६ जानेवारी २०२५ पासून हातकणंगले तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यांत येणार असल्याचा इशारा नगरसेविका सौ. रोहीणी खोत यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

निवेदनांत पुढे म्हटले आहे की, मला अथवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जर दमदाटी किंवा खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याची भीती घालून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही या द्वारे दिला आहे. त्यामुळे नगरसेवकांनाच उपोषणाचा इशारा द्यावा लागत असल्याने नगरपंचायतीचा भ्रष्ट कारभार चव्हाटयांवर आला आहे.

हद्दीतील विकासकामांना दिलेल्या वर्क ऑर्डर मधील कामाची मुदत संपल्यानंतर ही नगरपंचायतीची काहीही चूक अथवा अडथळा नसताना संबधीत ठेकेदारास अमाप मुदतवाढ देऊन ठेकेदाराचा फायदा बघितला जातो. या मुदत वाढीमध्ये कोणाचा फायदा अथवा टक्केवारी आहे का हे तपासून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नगरपंचायत स्थापनेपासून करण्यात आलेल्या विकासकामांचे फेर मूल्यांकन करून चुकीच्या केलेल्या कामाचे व ठेकेदारास जाणीवूर्वक वाढीव बिल काढून देणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित रक्कम ही त्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच वरील उल्लेख केलेल्या मुद्द्यामधील भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार शोधून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व मला न्याय देण्यात यावा. अन्यथा येत्या २६ जानेवारी पासून हातकणंगले तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण छेडण्याचा इशारा सौ. खोत यांनी दिला आहे . निवेदनाची प्रत नगर विकास मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, तहसील कार्यालय हातकणंगले आणि पोलीस ठाणे हातकणंगले यांना पाठवण्यांत आली आहे.