इचलकरंजी शहरात अनेक विकासकामांना सुरवात झालेली आहे. अनेक निधी देखील यासाठी मंजूर केले जात आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहासह संपूर्ण इमारत ही फायर प्रूफ होणार आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अत्याधुनिक व स्वयंचलित अग्निशमन रोधक यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर कामाच्या तांत्रिक बाबीची तपासणी बांधकाम विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे व त्यांच्या पथकाने केली व मक्तेदारास कोणत्याही तांत्रिक त्रुटी न राहता संपूर्ण यंत्रणा बसवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह व महापालिका इमारतीमध्ये अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रणा बसवण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. दोन पंपिंग स्टेशन, मोटर, स्वतंत्र पाण्याची टाकी, यासह संपूर्ण इमारत फायर प्रूफ करण्यासाठी सभागृह, सर्व दालनामध्ये आग प्रतिबंधक साहित्य बसवण्यात येणार आहे. तसेच स्मोक डिटेक्टर सह स्वयंचलित अलार्म बसवण्यात येणार आहेत त्यामुळे आग लागल्याची सूचना स्वयंचलित पद्धतीने तात्काळ मिळण्यास सुलभ होणार आहे.