प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अनेक एक स्पर्धा घेतल्या जातात. तसेच मनोरंजनात्मक असे विविध कार्यक्रम योजले जातात. तसेच अनेक दिग्गजांच्या वाढदिवसानिमित्त देखील शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. काल सोमवारी 30 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या वाढदिनी सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने भव्य कुस्तीचे मैदान भरविण्यात आले होते. या कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील मल्लानी हजेरी लावली होती. आयोजित कुस्ती मैदानास मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी महिला कुस्तीगीरांचा लक्षणीय सहभाग होता.पाच-पाच लाखांच्या दोन मानाच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पट काढत एकचाकी डावावर पंजाब केसरी भोला पंजाबीला अस्मानी दाखवले. आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने हरियाणा केसरी जयदीपकुमारवर मात केली.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मैदानात पुरुष आणि महिलांच्या 300 हुन अधिक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या. लाल मातीवरील या मैदानास पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पैलवान वैभव मानेने कुर्डूवाडीच्या महारुद्र काळेल वरती विजय मिळवला. वीर हनुमान कुस्ती केंद्राच्या निनाद बडरे ने पैलवान ओंकार गायकवाड वर पोकळ घिस्सा या डावावरती विजय मिळवला. जयदीप बडरेने सांगलीच्या श्रीजीत पाटील वर विजय मिळवला. पैलवान सतीश मुढेने सांगलीचा पैलवान भोसलेवर मात केली. बेनापूरच्या तालमीचा नाथा पवार आणि बामणीच्या परमेश्वर गाडे यांची कुस्ती अतिशय प्रेक्षणीय झाली. पण अखेर ती बरोबरीत सुटली.
मैदानासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आमदार सुहास भैया बाबर, सांगली जिल्हा बँके संचालक तानाजीराव पाटील, सभापती संतोष पुजारी, पैलवान नामदेव बडरे, मोहन बडरे, दत्तात्रय पाटील, मारुती जाधव, किसन जाधव, अमोल मोरे, विनोद वाक्षे, मनोज नांगरे व मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या कुस्त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. वेदांतिका पवारने अतितटीच्या लढतीत सिद्धी होळकर वर मात केली. भाटवड्याची ऋतुजा जाधवने आराधना नाईकवर तर सांगलीच्या शिवानी कुंभारने मुंबईच्या सिमरन कोरवरती विजय मिळवला. आटपाडीच्या वीर हनुमान कुस्ती केंद्राच्या मल्लांनी हे मैदान गाजवले. पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित मल्ल आणि प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.