खानापूर-आटपाडी मतदारसंघात महायुतीमध्ये पडणार वादाची ठिणगी!

महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी गटाचा समावेश आहे. जागा वाटपात खानापूर-आटपाडी मतदारसंघावरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे, मात्र सध्या ही जागा रिक्त असली तरी विद्यमान आमदारांकडे जागा जाणार आहे. तेथून बाबर यांचे पुत्र सुहास यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभा लढण्याचा चंग बांधल्याने महायुतीत वादाची चिन्हे आहेत. सांगली, मिरज, जत, शिराळा हे मतदारसंघ भाजपकडे आहेत.

याशिवाय पलूस-कडेगाव आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघ भाजपला मिळणार आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले आहे.वैभव पाटील आणि पडळकर यांनी खानापूर-आटपाडीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकला आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे. खानापूर-आटपाडीतील उमेदवारीवरून महायुतीमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

वास्तविक, खानापूर-आटपाडी मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर (Anil Babar) आमदार होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)-वैभव पाटील (Vaibhav Patil) यांच्या भूमिकेमुळे खानापूर-आटपाडी मतदारसंघात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.