अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. रस्त्यांच्या दुरावस्था झाल्याने अनेक अपघातात वाढ होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी जोर खात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील देखील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी जागोजागी खड्डे दिसत आहेत. पुणे-बेंगलूरू राष्ट्रीय महामार्गावरून कासारवाडी फाटयामार्गे जोतिबा, पन्हाळ्याला जाण्यास १९९ क्रमांकाचा राज्यमार्ग आहे. येथे सुमारे १०० ते १५० मी. अंतरावर रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत.
तीर्थक्षेत्र जोतिबा व ऐतिहासिक पन्हाळ्याला जाण्यासाठी हा मार्ग असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी असते. शिवाय जवळच औद्योगिक वसाहत असल्याने कामगार व विद्यार्थ्यांची रहदारी असते. येथे अनेक खड्डे पडल्याने नेमका वाहन चालकाला अंदाज येत नाही. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होतात. विद्यार्थ्यांना यातून चालत जाणे जोखमीचे झाले आहे. दिवसेंदिवस खड्डे मोठेच होत चालले आहेत. खड्डा चुकवण्यासाठी चालक उलट दिशेने गाडी चालवतात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. ज्योतिबा मार्गावरील कासारवाडी फाटा येथील रस्त्यावरील खड्ड्यात केक कापून खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला गेला.
रस्त्यावरील खड्ड्यात केक कापत प्रशासनाचा निषेध हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील तरूणांनी केला.याची परिसरात चर्चा सुरु आहे. खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी असे अनोखे आंदोलन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. याची चर्चा परिसरात व सोशल मीडियावर जोरात होती. यावेळी संतोष शिंदे, संदीप पोवार, अमर माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.