विनापरवाना बेकायदेशीर अतिक्रमनाचा विळखा सध्या अनेक शहरात आहेच. सध्या या अतिक्रमणामुळे अपघातांच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत राहिलेली आहे. तसेच शासनातर्फे अनेक नियम अटी देखील लावण्यात येत आहेत. परंतु या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे देखील अनेक वेळा निदर्शनास येत आहे. हातकणंगले तालुक्यातील टोप आणि कासारवाडी येथील विना परवाना बेकायदेशीररीत्या सुरू असलेले २८ क्रशर सील करण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली.
दरम्यान, मंगळवारी १७ बेकायदा क्रशर सील केले होते. असे दोन दिवसांत एकूण ४५ क्रशर सील करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी दिली. या कारवाईमुळे टोप, कासारवाडीसह शिये परिसरातील क्रशर व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. क्रशर व्यवसायासाठी राज्य सरकारने ट्रेडिंग लायसन (व्यापारी परवाना) आवश्यक केले आहे.
टोप व कासारवाडी येथे मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी लागणारा दगड, खडी यांचा व्यवसाय चालतो. कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या व्यवसायात शेकडो डंपर, पोकलँड, जेसीबी, शेकडो कामगार काम करतात. येथे क्रश सँड व्यवसायाने काही वर्षांतच पाय रोवले.
मात्र, या व्यवसायासाठी लागणारे शासकीय परवाने न घेताच अनेक जण व्यवसायकरत आहेत. त्यांची कमाई कोट्यवधीची आहे. अशा व्यवसायावर हातकणंगले तहसील पथकाने मंगळवारी व बुधवारी धडक कारवाई केली. यामध्ये एकूण ४५ क्रशर हे व्यापारी परवाना नाही म्हणून सील करण्यात आले. ही कारवाई हातकणंगलेचे नायब तहसीलदार संजय पुजारी, महसूल सहायक नीलेश सकपाळ, शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरे, टोपचे तलाठी सुनील बाजरी, शिरोलीचे तलाठी महेश सूर्यवंशी, शिरोली व टोप येथील कोतवाल यांनी केली.
दरम्यान, हातकणंगले तालुक्यात सुमारे ६२ क्रशर व्यावसायिक आहेत. यापैकी केवळ नऊ व्यावसायिकांकडे परवाने आहेत, तर टोप कासारवाडी परिसरात तीन क्रशर व्यावसायिकांकडे परवाने असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.