हॉटेल मालकावर कोयत्याने हल्ला वाठार येथील घटना…

वाठार-तळसंदे रस्त्यावर चारचाकी गाडीतून निघालेल्या हॉटेल मालक बाबासाहेब परशुराम तांबवेकर (वय ६०) यांच्या चारचाकी गाडीत लपून बसलेल्या चोरट्याने कोयत्याने हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळे वजनाची चेन तोडून पलायन केले.या घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील बाबासो तांबवेकर यांचे वाठार-कोडोली रस्त्यालगत तळसंदे हद्दीत हॉटेल आहे.रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करण्यासाठी वाठार येथून तळसंदेच्या दिशेने ते चारचाकी गाडीतून गेले होते. हॉटेल बंद करून वाठार येथे परत येत असताना त्यांच्या गाडीत पाठीमागे लपून बसलेल्या अज्ञातानेन पाठीमागून त्यांच्या गळ्यावर धारदार कोयता लावला व त्यांना हिंदीतून तुझ्या गळ्यातील सोन्याची चेन काढून दे, नाही तर गळा चिरून टाकीन, अशी धमकी दिली. यावेळी तांबवेकर यांनी त्यांच्या उजव्या हाताने त्याच्या हातातील कोयता धरला. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत तांबवेकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला शेतात गेली व थांबली.

यावेळी तांबवेकर हे गळ्यातील चेन देत नसल्याचे पाहून या चोरट्याने त्यांच्या हनुवटीवर चाकूने कापले व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने तोडून शेतातून पळून गेला.झटापटीत जखमी झालेले तांबवेकर यांनी याची माहिती नातेवाईकांना व हॉटेलमधील कर्मचारी यांना दिली. त्यांना उपचारास वडगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. हा चोरटा अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा असून, अंगात काळ्या रंगाची पँट व शर्ट घातलेला आहे. तसेच तोंडावर काळे कापड बांधलेले होते. अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करत आहेत.