कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP)असे आहे. सध्या चीनमध्ये कोरोनासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूचे भारतात 6 रुग्ण आढळले आहेत. यात कर्नाटक 2, गुजरात 1, पश्चिम बंगाल 1 आणि तामिळनाडू 2 अशी रुग्णांची संख्या आहे. तसेच या ह्युमन व्हायरसचे नागपूरात 2 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP) हा व्हायरस नक्की काय? आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यावी यासंदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचलनालयाने एक परिपत्रक जारी केले आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाची आकडेवारीही जाहीर केली आहे.
यानुसार २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यानुसार खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
काय काळजी घ्याल?
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करु नये?
- हस्तांदोलन
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क
- डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.