सध्या अपघात तसेच आत्महत्येच्या प्रकारात वाढ होतानाचे चित्र दिसत आहे. मनाला हेलावणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातहि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नाच्या एका महिन्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच्या दिवशीच ओढणीच्या साह्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना गुरुवार ९ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे घडली.
याबाबत अनिता निखिल घोंगडे (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा ५ डिसेंबर २०२४ रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर ८ डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाची रिसेप्शन पार्टीही दिली होती.
घरी मंगलकार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निःशब्द होती. बुधवारी निखिल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबीयांसमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते.
गुरुवारी पहाटे ४:३० च्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्राशेड मधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. दरम्यान, घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाइक तिचा शोध घेत असताना तिने पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी तिला खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.पती-पत्नीच्या एकापाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाच परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्ख गाव हळहळ व्यक्त करीत होते.
