Sangola News: सांगोल्यात मशाल की शेकाप? ठाकरेंच्या गुगलीने महाआघाडीत पुन्हा खळबळ

सांगोला विधानसभा मतदारसंघ राज्यात पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत दीपक साळुंखे यांनी मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी निर्माण होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.कारण सांगोला मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन मशाल हाती घेणाऱ्या साळुंखे यांना उमेदवारीची खात्री असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली, तर महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाला सांगोल्याची जागा सोडण्याचे सूतोवाच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी खासगीत अनेकदा सांगितली आहे, त्यामुळे ठाकरेंच्या गुगलीने महाविकास आघाडीत सांगलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले दीपक साळुंखे यांनी आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीच आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलाे असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते, त्यामुळे शिवसेनेकडून तिकिटाची खात्री असल्यामुळेच साळुंखे हे शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. दीपक साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले होते. विधानसभेला सांगोल्याची जागा शेकापला सोडण्यात येईल, असे सांगण्यात येत होते, त्यामुळे महाविकास आघाडीत सांगोला मतदारसंघ शेकापकडे जाईल, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, मागील दोन दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडींमुळे सांगोल्यावरून महाविकास आघाडीत वाद उफाळू शकतो.