शेटफळे येथे कारवाईच्या बडग्याने महामार्ग मोजणी सुरु

शेटफळे (Shetphale) ( आटपाडी ) गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी दरम्यान बुधवारी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करीत मोजणी रोखली . पण गुरुवारी प्रशासनाने समुपदेशन करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला . तगडा पोलीस बंदोबस्त , धाक , कारवाईचा अप्रत्यक्ष इशारा देताच हा विरोध मोडीत निघाला . सकाळपासून मोजणी पुन्हा सुरु केली. आज ७० टक्के मोजणी पूर्ण झाली.

बुधवारी शेतकऱ्यांनी एकजुटीने जानिनिवार झोपून यंत्रणेला रोखून राग व्यक्त केला. गुरुवारी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांधल, तहसीलदार सागर ढवळे , पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करत समजून घातली. डॉ. बांधल यांनी रेडीरेकनरच्या पाचपट दराने भरपाई , पिकांचे , फळबागांचे व अन्य नुकसानीचे पंचनामे करून योग्य मोबदला दिला जाईल , अशी हमी दिली. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे मोजणीला होणारा विरोध मावळला .

बुधवारी गोंधळ झाल्याने गुरुवारी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. शेतकरी एकजूट आज दिसली नाही . त्यांच्यात फूट पडली. बंदोबस्त आणि संभाव्य कारवाईचा बडगा उगारल्याने मोजणी दरम्यान कोणी अडथळा आणला नाही.

शेटफळे (Shetphale) येथील पाटील मळा , तुकाराम बुवाचा मळा , मोरे मळा परिसरातील मोजनो पार पडली . शेतकऱ्यांनी समजूतदारपणे प्रशासनास सहकार्य केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही . शांततेत मोजणी पार पडल्याने अधिकाऱ्यांनी देखील सुटकेचा श्वास घेतला.